औरंगाबाद - गुन्हेशाखेने ताब्यात घेतलेल्या सराईत गुन्हेगाराने पोलिस आयुक्तालयातून हातकडीसह पोबारा केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. मध्यवर्ती बसस्थानकावर तुटलेली हातकडी सापडल्यानंतर पोलिस आयुक्तालयातून गुन्हेशाखेच्या ताब्यातील आरोपी पसार झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आहे. पोलिसांच्या ताब्यातील आरोपी थेट पोलिस आयुक्तालयातून पसार झाल्याने औरंगाबाद पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.
गुरुवारी रात्री पकडले, शुक्रवारी सकाळी पसार
शहरातील सराईत गुन्हेगार शेख चांद (३५) याला गुरुवारी मध्यरात्री
गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकांच्या पथकाने पेट्रोलिंग करीत असताना सेन्ट्रल नाका
परिसरातून ताब्यात घेतले होते. त्याला रात्रभर आयुक्तालयात गुन्हेशाखेच्या ताब्यात
ठेवण्यात आले. शुक्रवारी सकाळी ८ ते ९ वाजता ड्यूटी चेंज टायमिंग दरम्यान संधी
मिळताच चांद आयुक्तालयातून पसार झाला. शुक्रवारी सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात
त्याने हातकडी तोडली आणि हातकडी तिथेच टाकून तो पसार झाला असण्याची शक्यता
पोलिसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी
क्रांतीचौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोण आहे शेख चांद
शेख चांद हा औरंगाबाद शहरातील सराईत गुन्हेगार आहे.
पाकिटमारी आणि चेनस्नॅचिंगमध्ये तो पटाईत आहे. शेख चांदविरोधात अनेक चोरीचे अनेक
गुन्हे दाखल आहे. यातील काही गुन्ह्यांमध्ये तो जामीनावर सुटला होता. मात्र
कोर्टकेस सुरु असताना तो एकदाही कोर्टात हजर न झाल्यामुळे त्याच्याविरोधात नॉन बेलेबल
वॉरंट इश्यू करण्यात आले होते.
... आणि पोलिस गाफिल राहिले












